Saturday, January 8, 2011

अजगर

पावलं तरंगायला लागली
की
वासनेचा अजगर
वळवळू लागतो
इतक्या कष्टानं
त्याला झोपवलं होतं
हे माहीत असतं
तरी पावलं
तरंगावी
असं वाटतं.
पुन्हा पुन्हा
मग कशाला
इतकी नाटकं?

आत्ता पावलं
छान तरंगताहेत
वळवळीचं पुढं
काय?

आनंद थत्ते
०१.०१.२०११

कविता?

ड्रिब मधून ठिबकतंय,
आशेचं सलाईन.
सूक्ष्मपणे पेशीत भिनतोय
क्लोरोफ़ाँर्मचा दर्प.
जीर्ण अंधारात
रातराणीला पडतंय
चंदेरी स्वप्न
चारमिनार संपता संपता
अचानक आलेले
नादशून्य शब्द
SHE IS DEAD

आनंद थत्ते
३०.१२.२०१०

वेळ फार राहिला नाहिए

वेळ फार राहिला नाहिए
नीट निरवानिरव केली पाहिजे.
सगळ्य़ा कविता फाडून टाकल्या.
सगळी चित्रं आणि गाणी.
एकही खूण चुकून
रहायला नको.
संबंधांच्या गाठी सोडाव्यात
तर सगळ्या निरगाठी.
अणकुचीदार दाभण घेतला
गाठी रक्तबंबाळ.
जखमा अजून ओल्या?
बाहेर पडली
गोट्या,पिसं आणि शिंपले
नंतर खडे, मणी, रुमाल.
किती फसवावं स्वतःला?
हे निर्विकार पणे बाजूला सारलं
समोर उसळणा-या वासनांचा
डोह
आता याचं काय करणार?
आणि कधी?
वेळ फार राहिला नाहिए


आनंद थत्ते
२०.१२.२०१०